कणकवलीत शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न
कणकवली, दि. ११ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा: कणकवली तालुका यांचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच कणकवली येथील मराठा मंडळात तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महिला आघाडीच्या सदस्यांच्या ईशस्तवन आणि स्वागतपद्याने झाली. राज्य शिक्षक नेते उदय शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. राज्य महासचिव राजन कोरगावकर , जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस , जिल्हा सचिव तुषार आरोसकर , महिला जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर , राज्य कार्यकारिणी सदस्य दादा जांभवडेकर , सचिन मदने , संतोष परब , जिल्हा शिक्षक नेत्या सुरेखा कदम , ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर , सचिव संतोष कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष धीरज हुंबे , रुपेश गरुड , जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर , जिल्हा विभाग उपाध्यक्ष अजय तांबे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनायक जाधव , जिल्हा विभागीय उपाध्यक्ष किशोर गोसावी , जिल्हा सल्लागार संदीप गोसावी , जिल्हा संघटक निलेश ठाकूर , ईश्वरलाल कदम , पतपेढी संचालक नारायण नाईक , श्रीकृष्ण कांबळी , पतपेढी उपाध्यक्षा ऋतुजा जंगले , चंद्रसेन पाताडे , मंगेश कांबळी , महिला तालुकाध्यक्षा नेहा मोरे , महिला तालुका सरचिटणीस विनिता शिरसाट , जिल्हा कार्यकारी सर्व सदस्य , तालुका कार्यकारिणी सदस्य आणि सभासद शिलेदार बहुसंख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी प्रास्ताविक केले, तर मागील तीन वर्षांच्या कार्याचा अहवाल वाचण्यात आला.
या अधिवेशनात संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत २२ केंद्रांतील २२ दत्तक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यासोबतच, शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावलेल्या १३ सेवानिवृत्त शिक्षकांचा आणि विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या ४ शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. विविध क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या ४८ विद्यार्थ्यांचाही यावेळी समारंभपूर्वक गौरव करण्यात आला.
राज्यातील ज्येष्ठ शिक्षक नेत्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. यानंतर सन २०२५ ते २०२८ या पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. मागील कार्यकारिणीने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले आणि नवीन कार्यकारिणीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
दुपारच्या सत्रात सर्व शिक्षक सदस्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षकांनी एकत्र येत विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यात अनेक शिक्षकांनी आपली कला सादर केली. सायंकाळच्या सत्रात समितीच्या शिक्षक सदस्यांनी 'यक्ष उद्धार' हे प्रसिद्ध दशावतारी नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि रसिकांकडून भरभरून दाद मिळवली.
एकंदरीत, कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे हे त्रैवार्षिक अधिवेशन अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. या अधिवेशनातून शिक्षकांना नवीन ऊर्जा मिळाली आणि पुढील वाटचालीस प्रेरणा मिळाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम, सुशांत मर्गज यांनी केले , तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस संतोष कांबळे यांनी केले.


















































































































































































































































































































































































































































































































