बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

गंभीर जखमी विद्यार्थीनीला शिक्षक समितीचा मदतीचा हात

 🤝 गंभीर जखमी विद्यार्थीनीला शिक्षक समितीचा मदतीचा हात 🤝

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

           जि.प.शाळा शिडवणे कोनेवाडीच्या इयत्ता सातवीतील कु.अनुष्का गुरुदास टक्के या विद्यार्थीनीचा शाळेत खेळत असताना पडल्याने हात फ्रॅक्चर झाला. तीला डॉ.नवरे हॉस्पिटल, कणकवली येथे दाखल करण्यात आले. सदर विद्यार्थीनीची परिस्थिती गरीबीची असल्याने शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने आज सकाळी १०:०० वा. या विद्यार्थीनीला तात्काळ रु. ५०००/- ची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत तिच्या पालकांकडे सुपुर्द करण्यात आली.

          सदर प्रसंगी तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर, सरचिटणीस महेंद्र पवार, महिला आघाडी अध्यक्ष नेहा मोरे, प्रवक्ते विनायक जाधव, सल्लागार सत्यवान घाडीगांवकर, शाळेतील शिक्षक मंगेश खांबाळकर व पालक इ. उपस्थित होते.



मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

🛑 रक्तदाती : शिक्षक समिती

🛑 रक्तदाती : शिक्षक समिती

          रक्ताचं दान हे जणू प्राणांचं दान आहे. एखादा गरजू त्या रक्तामुळे मृत्यूच्या जबड्यातून परत येऊ शकण्याची ताकद त्यात आहे. याचं महत्त्व आणि निकड लक्षात घेऊनच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दरवर्षी रक्तदानाचं शिबीर आयोजित करीत असते. 

          गेल्या शनिवारी कणकवली तालुका शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झालं. त्यात तीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं. या सर्व रक्तदात्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. या समितीच्या पाईकांनी शिक्षणाचं व्रत जोपासत असताना ' रक्तदान हेच श्रेष्ठदान ' हे ब्रीदवाक्य जाणून उत्स्फूर्तपणे रक्ताचं दान केलं आहे. त्यांच्या या दानाला दाद दिली पाहिजे.

          त्यांच्या शरीरातील एकेक रक्ताचा कण रक्तपेढीसाठी महत्त्वाचा आहे. या निरोगी शिक्षकांनी दिलेलं रक्त कोणासाठी तरी प्राणदान ठरणार आहे. ज्याला रक्ताची निकड असेल त्या व्यक्तीलाच त्याचं महत्त्व अधिक पटीने समजू शकतं. 

          सकाळी लवकरच रक्तदान शिबीर सुरु झालं. त्यावेळी पुरुष शिक्षकच नव्हे तर महिला शिक्षिका देखील रक्तदान करायला आल्या होत्या. रक्त देत असताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. हसतमुखाने रक्त देताना मी त्यांना पाहत होतो. त्यांचे चेहरे टिपत होतो. त्यातील काही शिक्षक बांधव दर तीन महिन्यांनी रक्तदान करणारे आहेत. अर्थात आपल्या शरीराची तपासणी केल्यानंतरच रक्तदान करता येते. काहींना ते करता आलं नाही म्हणून त्यांचे चेहरे  हिरमुसलेले झाले होते. मनात द्यायचं असतं , पण देता येत नाही ही त्यांची खंत होती. ते सक्षम होतील तेव्हा पुढच्या वेळी नक्कीच रक्तदान करतील यांत तिळमात्र शंका नाही. 

          शनिवारी सकाळची शाळा करुन रक्तदानासाठी गडबडीने येणाऱ्या शिक्षकांना मानायलाच हवे. समितीचा हा एक समाजोपयोगी उपक्रम असला तरी त्याला हे सर्व शिक्षक समितीचे पाईक समर्थपणे साथ देतात म्हणूनच हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. शिक्षक समितीच्या पदाधिकारी यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी केलेली धडपड आणि त्याचं परिपूर्ण नियोजन हेही कौतुकास्पद आहे. सर्व पाईकांचे हार्दिक आभार.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

🔵 गंभीर जखमी विद्यार्थिनीला शिक्षक समितीचा मदतीचा हात

🔵 गंभीर जखमी विद्यार्थिनीला शिक्षक समितीचा मदतीचा हात

कणकवली : 

          जि.प.शाळा बिडवाडी हुंबरणेच्या इयत्ता पहिलीतील कु.दुर्वा राजाराम चव्हाण या विद्यार्थिनीचा मंगळवारी शाळेतून घरी जात असताना पडल्याने हात फ्रॅक्चर झाला होता. तिला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल करण्यात आले होते. 

          सदर विद्यार्थिनीची परिस्थिती अतिशय गरीबीची असल्याने शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने मंगळवारी सायंकाळी या विद्यार्थीनीला तात्काळ रु. ५०००/- ची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत तिच्या पालकांकडे सुपुर्द करण्यात आली.

          सदर प्रसंगी शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर, सरचिटणीस महेंद्र पवार, जिल्हा संघटक अजय तांबे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा गुरव , उपशिक्षिका स्नेहा राणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.



शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

शिक्षक समिती कणकवली शाखेचे रक्तदान शिबिर संपन्न

 🛑 शिक्षक समिती कणकवली शाखेचे रक्तदान शिबिर संपन्न

तीसपेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर रक्तदात्यांनी केले रक्तदान

कणकवली ( भालचंद्र संस्थान )

         सिंधुदुर्ग जिल्हयातील रक्ताची गरज लक्षात घेत शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने शनिवार दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी प.पु.भालचंद्र महाराज आश्रम संस्थान ,  कणकवली येथे सकाळी ९ : ०० वा. रक्तदान शिबीर संपन्न झाले. 

          त्यावेळी 30 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला. संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला साथ देत " रक्तदान हेच श्रेष्ठ दान " या सुवचनाप्रमाणे भरीव योगदान दिले. 

       आपल्या या रक्तदानामुळे आपण शिक्षक संघटनेच्या वतीने कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो ही निर्मळ भावना ठेवून सर्व रक्तदात्यांनी स्वेच्छेने व हसतमुखाने रक्तदान केले. 

          त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा , कणकवली तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

      🩸 रक्तदान .......जीवनदान🩸🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 अध्यक्ष / सचिव

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

 शाखा कणकवली














































































































🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...