कोविड 19 मुळे निधन पावलेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदतीचा हात
आम्ही तुमच्यासोबत आहोत असे मानसिक व आर्थिक बळ
कणकवली : दिनांक : 21 ऑगस्ट 2021 : ( प्रवीण कुबल )
कोरोनाने अनेकांच्या घरात मृत्यूने थैमान मांडलेले असताना त्याचा फटका शाळेतील मुलांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु शिक्षक समितीने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत निधन झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदतीचा हात देत ' आम्ही तुमच्यासोबत आहोत ' असा दिलेला दिलासा म्हणजे एक मानसिक आधारच ठरणार आहे असे मत कणकवली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.किशोर गवस यांनी हळवल केंद्रशाळेत केले.
आतापर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असताना कणकवली शाखेने शाळा बंद , शिक्षण सुरु च्या काळातही कलांकुर , स्वातंत्र्यदिन गीतगायन पंधरवडा , खजिना कथांचा , रक्तदान , विद्यार्थी दत्तक पालक योजना , खेळताना अपघात झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आकस्मिक पाच हजार रुपये निधी , मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन करणारा गाऊ आनंदे उपक्रम , जिल्हा शाखेच्या वतीने 45 लाखांचा निधी उभारून ऑक्सिजन प्लांट असे उपक्रम राबवले आहेत. पालकांचे , विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हित लक्षात घेऊन राबवलेले हे उपक्रम स्तुत्य असल्याबाबत मान्यवरांनी समितीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कणकवली तालुका उपाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर यांनी केले. त्यात त्यांनी संघटनेच्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव म्हणाले , " आम्ही सर्वजण कोविडमुळे निधन झालेल्या पालकांच्या मुलांसाठी खारीचा वाटा उचलत आहोत , त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आमची कधी पुन्हा मदत लागली तरीही आम्ही त्यांच्या सोबत आहोत. " गेल्यावर्षीही गरजूंना अन्नधान्यासाठी वीस हजार पर्यंतची मदत केल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रप्रमुख मा. अनंत राणे म्हणाले , " शिक्षक समितीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवले जात असून ते तातडीचे व प्रसंगानुरूप मदत करणारे आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यामुळे नक्कीच उभारी येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
" ज्यांना गरज , त्यांना मदत " अशा प्रासंगिक मदत करणाऱ्या संघटनेच्या भरीव कार्याबद्दल गटशिक्षणाधिकारी मा.किशोर गवस यांनी कौतुक केले. तसेच शासनाच्या वतीने कोविडग्रस्त पाल्यांना मासिक मानधन मिळण्याच्या प्रस्तावाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. या गरजू पाल्यांच्या पंखात बळ येवो आणि त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो अशीही भावना सर्वांनी व्यक्त केली.
महिला आघाडी तालुकाध्यक्षा मा. निकिता ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त करताना उपस्थित पालकांना व पाल्यांना धीर दिला. त्यावेळी कणकवली शिक्षक बँकेचे संचालक मा. आनंद तांबे , हळवल केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्वेता मेस्त्री , हळवल केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. विक्रांत ठाकूर , जिल्हा विभागीय अध्यक्ष महेंद्र पवार , सल्लागार मा.किशोर गोसावी , मा. सदानंद ठाकूर , मा. सुनिल कदम , मा. श्रीकृष्ण ठाणेकर , मा. राजेंद्र गोसावी, मा. सायली राणे , मा. श्रेया ठाणेकर आणि पालक उपस्थित होते.
कणकवलीत अशा १३ मुलांना आर्थिक साहाय्य दिले जात असून त्यापैकी कळसुली व हळवल केंद्रातील समृद्धी अमित ठाकूर , किमया सतीश राऊळ आणि हार्दिक सतीश राऊळ यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत समितीकडून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कणकवली तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गज यांनी केले . कणकवली तालुका विभागीय उपाध्यक्ष मा. दिलीप धामापूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.
👌👌 very nice
उत्तर द्याहटवा