मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

शिक्षक समितीचे कार्य प्रेरणादायी : मा. सुहास पाताडे ( शिक्षण विस्तार अधिकारी )

🛑 शिक्षक समितीचे कार्य प्रेरणादायी : शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे 

तळेरे : 

          कोरोनाने अनेकांच्या घरात मृत्यूने थैमान मांडलेले असताना त्याचा फटका शाळेतील मुलांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु शिक्षक समितीने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. निधन झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदतीचा हात देत ' आम्ही तुमच्यासोबत आहोत ' असा दिलासा दिलेला आहे. त्यामुळे शिक्षक समितीचे कार्य हे इतरांनाही प्रेरणादायी असेच आहे असे मत कणकवली पंचायत समितीचे तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी तळेरे नं. १ शाळेत केले. 

          आतापर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असताना कणकवली शाखेने  शाळा बंद , शिक्षण सुरु च्या काळातही कलांकुर , स्वातंत्र्यदिन गीतगायन पंधरवडा , खजिना कथांचा , रक्तदान , विद्यार्थी दत्तक पालक योजना , खेळताना अपघात झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आकस्मिक पाच हजार रुपये निधी , मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन करणारा गाऊ आनंदे उपक्रम , जिल्हा शाखेच्या वतीने 45 लाखांचा निधी उभारून ऑक्सिजन प्लांट असे उपक्रम राबवले आहेत. पालकांचे , विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हित लक्षात घेऊन राबवलेले हे उपक्रम स्तुत्य असल्याबाबत मान्यवरांनी समितीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. 

          कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत ज्ञानेश्वर परदेशी यांनी केले. प्रास्ताविक तळेरे विभागीय अध्यक्ष मंगेश मुद्रस यांनी केले. कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी संघटनेच्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव म्हणाले , " आम्ही सर्वजण कोविडमुळे निधन झालेल्या पालकांच्या मुलांसाठी खारीचा वाटा उचलत आहोत , त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आमची कधी पुन्हा मदत लागली तरीही आम्ही त्यांच्या सोबत आहोत. " गेल्यावर्षीही गरजूंना अन्नधान्यासाठी वीस हजार पर्यंतची मदत केल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रप्रमुख गोपाळ जाधव म्हणाले , " शिक्षक समितीच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम वैशिष्टपूर्ण असून परिस्थितीनुसार त्यात नाविण्यपूर्णता येत आहे ही उल्लेखनीय बाब आहे. " ज्यांना गरज , त्यांना मदत " अशा प्रासंगिक मदत करणाऱ्या संघटनेच्या भरीव कार्याबद्दल सुहास पाताडे यांनी कौतुक केले. 

          कणकवलीत अशा १३ मुलांना आर्थिक साहाय्य दिले जात असून त्यापैकी ओमकार रमेश सूर्यवंशी, शाळा ओझरम नं. १ व सिध्दीक सोनू शेळके, शाळा तळेरे नं. १ यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत समितीकडून देण्यात आली. त्यावेळी केंद्रप्रमुख संजय पवार , कणकवली शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे , तळेरे नं. १ च्या स्मिता कदम , तालुका संघटक अजित कदम , सत्यवान चव्हाण , संदिप ब्रम्हदंडे , महिला कार्याध्यक्षा सुप्रिया म्हसकर , महिला कोषाध्यक्षा ऋतुजा जंगले , केंद्रसंघटक पूजा शंकरदास आदी उपस्थित होते. 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कणकवली तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी केले . कणकवली तालुका संघटक सत्यवान घाडीगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले. 












 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...